रत्नागिरी - नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायकी असणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळच्या निवडणुकीत नाव साधर्म्य असलेले २ काय १० उमेदवार उभे केले असते तरी त्याचा फरक पडला नसता. असे म्हणत तटकरेंनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मागील म्हणजेच २०१४ च्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या सुनील तटकरे यांचा अवघ्या २१०० मतांनी पराभव झाला होता. त्यावेळी त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेल्या सुनील तटकरे या दुसऱ्या उमेदवाराने जवळपास ९ हजार ८४९ मते घेतली होती. या मताचा फटका सुनील तटकरे यांना बसला होता. यावेळी सुद्धा त्यांच्याविरोधात सुनील तटकरे असे नाव असलेले २ उमेदवार रिंगणात आहेत.
या संदर्भात सुनील तटकरे यांना विचारले असता मागील वेळी नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळेच आपला पराभव झाला होता. यावेळी मात्र आम्ही योग्य ती खबरदारी घेतली होती. यावेळी कार्यकर्तेही सतर्क होते. मतदारसुद्धा प्रगल्भ आहेत. यावेळी आम्ही चिन्हावर भर दिला होता. शिवाय फोटोही होताच. त्यामुळे यंदा २ काय असे १० सुनील तटकरे उभे केले असते तरी फरक पडणार नाही असे म्हणत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.