रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण झाल्यावर त्याच्यावर टोल लावण्याचे या सरकारने ठरविले आहे. पण मी खासदार झाल्यावर हा टोल रद्द करून घेईल, हे माझे वचन आहे. असे आश्वासन रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दिले. ते खेड तालुक्यातील साटव येथील प्रचारसभेत बोलत होते.
सुनील तटकरे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर टोल लावण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा विभागातून ६ वेळा निवडून गेलेले खासदार, केंद्रातले अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी केली आहे. या रस्त्याचे काम आपण पालकमंत्री असताना प्रस्तावित केले होते. त्यावेळी टोल लागणार नव्हता. त्यामुळे खासदार होऊन संसदेत गेल्यावर प्रथमतः या रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्णत्वास नेईन, असे तटकरे यावेळी म्हणाले. खेडमध्ये दूरच्या गाड्यांना थांबे देण्याचा प्रयत्न करू, असेही तटकरेंनी आश्वासन दिले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार संजय कदम, जिल्हा परिषद सदस्या सिद्धी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.