रत्नागिरी - राजकारणात सभ्यता असावी लागते, माझ्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी सभ्यता पाळली. मात्र, केंद्रीय मंत्र्यांना डोळ्यासमोर पराभव दिसू लागल्याने त्यांनी खालच्या पातळीवर आरोप केले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना तटकरे म्हणाले, आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने २३ मेनंतर किती अदृश्य हातांनी मला मदत केली याचे चित्र स्पष्ट होईल.
रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे हे शुक्रवारी रत्नागिरीत आले होते. दिवंगत माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते रत्नागिरीत आले होते. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी उमेश शेट्ये यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या. विकासाला चेहरा देणारे रत्नागिरीकरांचे छत्र हरपले. शेट्ये यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत दिलखुलास चर्चा केली.