रत्नागिरी - जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोना रुग्णांची सेवा करता करता 'त्यांना'ही कोरोनाची लागण झाली. मात्र कोरोनातून बरं झाल्यावरही दुसऱ्या विभागात काम करण्याची संधी असतानाही त्यांनी पुन्हा अतिदक्षता विभागातच कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. कुटुंब आणि नोकरीची सांगड घालताना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र रुग्णांकडून मिळणारा 'फीडबॅक' हीच आपल्या कामाची पोचपावती असल्याचं सांगत गेली सात महिने स्वरा सोडये कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.
स्वरा सोडये या गेली 18 वर्षे जिल्हा रुग्णालयात अधिपरिचारीका म्हणून काम करत आहेत. त्यांचे पती संजीव सोडये डॉक्टर असून राजापूरमधील देवाचे गोठणे या गावी खासगी दवाखाना चालवतात. स्वरा सोडये या अनेक वर्षे अतिदक्षता विभागात काम करत आहेत.
दरम्यान, रत्नागिरीत ज्या दिवशी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या दिवसापासून सोडये या अतिदक्षता विभागात काम करत आहेत. अतिदक्षता विभागात कोरोनाची लागण झालेले अनेक अत्यवस्थ रुग्ण असायचे. सुरुवातीला जिल्ह्यात एकच कोविड सेंटर असल्याने सर्वच कोरोनाचे रुग्ण या ठिकाणी दाखल होत होते. सुरुवातीला कर्मचारी वर्गही कमी होता. 6 ते 7 कर्मचाऱ्यांवरच अतिदक्षता विभागाची जबाबदारी होती. मात्र रुग्णांची संख्या वाढल्याने अतिदक्षता विभाग कमी पडू लागला. त्यानंतर 18 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. स्वरा सोडये यांना अतिदक्षता विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव होता. त्यामुळे कोरोनाच्या या परिस्थितीतही रुग्णांच्या सेवेसाठी या विभागातच काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सुरुवातीच्या काळात सर्वांचीच परीक्षा
कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर सुरुवातीला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी यायच्या. रुग्णांची संख्या वाढत होती, मात्र कर्मचारी वर्ग कमी होता. त्यात पेशंटच्या नातेवाईकांना सामोरं जाताना अनंत अडचणी यायच्या. वेळेवर जेवणही करता येत नव्हतं, स्वतःचे प्रॉब्लेम असले तर सुट्टी सुद्धा सुरुवातीला ऍडजेस्ट व्हायची नाही. पण हे सर्व प्रॉब्लेम घरीच ठेऊन, रुग्ण लवकर बरा कसा होईल, याकडे आम्ही लक्ष द्यायचो, असं स्वरा सोडये सांगतात. या सेवा देत असतानाच पेशंटच्या संपर्कात जास्त वेळ रहायला लागायचं, कारण नातेवाईक जवळ नसायचे. पेशंट येताना एकटाच असायचा, त्यामुळे पेशंटला भरवण्यापासून, त्याला औषधे देण्यापासून त्याची सर्व काळजी घेण्याचं काम आम्हीच करायचो आणि आजही हे सर्व करत असल्याचं स्वरा सोडये अभिमानाने सांगतात.
अखेर माझीही चाचणी पॉझिटिव्ह
रुग्णांची सेवा करता करता स्वरा यांना सप्टेंबरमध्ये कोरोनाची लागण झाली. याबाबत सांगताना स्वरा सोडये म्हणतात की, ज्यावेळी मला हे समजलं की आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यावेळी माझी नाईट शिफ्ट होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच काय करावं ते सुचत नव्हतं. माझी मुलं घरी होती. पती राजापूरमध्ये होते. आजूबाजूला जवळचे नातेवाईकही नव्हते. त्यामुळे शेवटी स्वतःच अॅडमिट झाले. सकाळी साडे दहावाजता पतीशी संपर्क झाला. त्यानंतर लगेचच दुपारी ते आले. आणि त्यावेळी मला मोठा मानसिक आधार मिळाला. अखेर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शेवटी होम आयसोलेशन घेतलं. मुलांना एका नातेवाईकांंकडे ठेवलं.. मी अॅडमिट झाल्यापासून जवळपास 15 दिवस मुलांची भेट झाली नाही. या सर्व परिस्थितीत मला माझ्या पतीचा मोठा आधार होता.
बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की त्या विभागात पुन्हा जाऊ नका, पण मी ज्या विभागात काम करत होते, त्या विभागाबद्दल मला एक आपुलकी होती. आपण पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काम करतोय, आणि जर चांगल्या मनाने सेवा देत आहोत, त्यामुळे पुन्हा आपण त्याच विभागात चांगली सेवा बजावू शकतो हा मला आत्मविश्वास होता. कोरोनातून बरं झाल्यावर कामावर रुजू झाले, तेव्हा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संघमित्रा फुले यांनीही मला विचारलं होतं, की तुम्हाला कोणत्या विभागात काम करायचं आहे. त्यावेळी त्यांना मी सांगितलं की जिथे मी पहिलं काम करत होते, त्याच अतिदक्षता विभागात काम करेन. तो विभाग मी पुन्हा मागून घेतल्याचं स्वरा सोडये अभिमानाने सांगतात.