रत्नागिरी - खेड तालुक्यातील सुसेरी गावातील शेतीच्या कामासाठी गेलेले ६ शेतकरी नारंगी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकले होते. पुराच्या पाण्यातून त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. उत्तर रत्नागिरीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचे पाहायला मिळाले.
पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांनी फक्त एका झाडाचा आधार घेतला होता. स्थानिकांनी याची माहिती तहसीलदारांना दिली. यानंतर तातडीने प्रशासन आणि खेडच्या मदत ग्रुपने घटनास्थळी धाव घेतली. या सहाही जणांना दोरीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले.
हे सगळे शेतकरी शेतात अडकलेला ट्रॅक्टर काढण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढला आणि हे सगळे पुराच्या पाण्यात अडकले. खेड येथील मदत ग्रुप आणि स्थानिक तरूणांनी अडकलेल्या सहाही जणांना बाहेर काढले.