रत्नागिरी - जिल्ह्यात 'मिशन ब्रेक द चेन'अंतर्गत लाॅकडाऊन वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यात आता १५ जुलैपर्यंत लाॅकडाऊन आहे. पण, कडक लाॅकडाऊनचा निर्णय जिल्हा प्रशासनाने अवघ्या २४ तासांत बदलला आहे. बाजारपेठा बंद ठेवल्याने अनेक व्यापाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तोडगा काढला. त्यानुसार प्रशासनाकडून बाजारपेठेत एका बाजूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
नवीन निर्णयानुसार रत्नागिरी शहरात आज दुकाने उघडण्यात आली आहेत. मात्र, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, बाजारात फिरताना तोंडाला मास्क लावणे, हे नियम पाळणे बंधनकारक आहे. यावर प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. नियम पाळत नाही, अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. रत्नागिरी नगर परिषदेचे एक पथक तसेच पोलीस बाजारपेठेत फिरून या नियमांचे पालन होत आहे की नाही? याची पाहणी करत आहेत. तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी देखील मास्क लावणे, दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मास्क लावला नसेल, तर ५०० रुपये दंड आकाराला जात आहे.