रत्नागिरी - राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र राज्यसभा बिनविरोध निवडणुकीची परंपरा भाजपने खंडित केली आहे. भाजपच्या अडेलपणामुळे आणि आपण कोणावरही दबाव आणून आपल्या बाजूने मतदान वळवू शकतो अशा कृतीमुळे ही निवडणूक लादण्यात आली आहे. तरी देखील महाविकास आघाडीकडे आजच्या घडीला 168 आमदारांची मते आहेत. त्यामुळे, पहिल्या फेरीतच महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
हेही वाचा - CCTV : पॉलीश करण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी मारला सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला
राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही मग काय ईडी, सीबीआय, एनआयएचा बाजार होणार आहे का? असा खडा सवाल करत शिवसेना प्रवक्ते आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. भास्कर जाधव म्हणाले की, खरंतर कोणीही घोडेबाजार घोडेबाजार असा आरोप करायला नको होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीने पावले टाकली होती. मात्र, भाजपकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. तुमच्याकडे मताधिक्य नसताना तुम्ही कुठल्या आधारावर तिसऱ्या जागेवर उमेदवार उभा केला, असा सवाल भास्कर जाधव यांनी भाजपला केला आहे. दरम्यान 5 जूनला मनसेचा कोणी पदाधिकारी अयोध्येत गेला त्याला महत्व नाही, राज ठाकरे जर गेले असते तर त्या दौऱ्याचे महत्त्व वाटले असते, असा चिमटाही जाधव यांनी राज ठाकरे यांना यावेळी काढला.
हेही वाचा - Solgaon Refinery Protest : सोलगावमध्ये रिफायनरी विरोधात नागरीक एकवटले, महिलांही रस्त्यावर