रत्नागिरी - रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघामध्ये तब्बल 230 शिवसेना समर्थक उमेदवार ग्रामपंचयत निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सद्यास्थितीमध्ये 63 पैकी 34 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचा सरपंच होऊ शकतो. तसेच 15 तारखेनंतर तब्बल 50 हून अधिक ग्रामपंचायती या शिवसेनेच्या ताब्यात येतील, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. ते रत्नागिरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
यावेळी बोलताना सामंत म्हणाले की, महाविकास आघाडीबाबत आपण राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम यांच्याशी चर्चा केली होती. मात्र ज्या ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी मित्र पक्षांच्या पदाधिकार्यांनी संपर्क केला. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सदस्यांना आपण संधी दिली.
'या' ठिकाणी शिवसेना समर्थक उमेदवारांची बिनविरोध निवड
रत्नागिरी-संगमेश्वर मतदार संघातील संगमेश्वर तालुक्यातील परचुरी येथे 11, पिरंदवणे 7, वांद्री 4, कोंड्ये 5, डावखोल 7, कुरधुंडा 2 जागा बिनविरोध झाल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यात उक्षी 7, राई 1, चवे 7, खालगाव 9, जांभरुण 7, खरवते 7, गणपतीपुळे 1, चिंद्रवली 9, कुरतडे 9, झरे 5, हरचिरी 11, भाट्ये 3, पानवल 7, नाचणे 4, कशेळी 2, कापडगाव 7, हातखंबा 7, खानू 7, पाली 10, खेडशी 9, मजगाव 2, नाखरे 2, पावस 2, गावखडी 2, रिळ 7, आगरनरळ 7, गुंबद 7, सैतवडे 1 व वरवडे मध्ये 1 जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच विजय
दरम्यान रत्नागिरीतील चाफे, देवूड, ओरी, कोतवडे, नेवरे, चांदेराई, कोळंबे, गोळप, नाणीज, काळबादेवी, बसणी, मिर्या, सडामिर्या, दांडेआडोम, डोर्ले, शिवारआंबेरे, वाटद, गडनरळ या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत असून, शिवसैनिकांनी या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच विजय होईल असा दावा सामंत यांनी यावेळी केला आहे.