रत्नागिरी - कोकणातील महत्त्वाचे सण म्हणजे गणेशोत्सव आणि शिमगोत्सव. आजपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे. फाल्गुन शुद्ध पंचमीला कोकणात शिमगोत्सवाला प्रारंभ होतो. या दिवसाला फागपंचमी असेदेखील म्हटले जाते. याच दिवशी होळी आणण्याची प्रथा आहे.
कोकणात होळी आणण्याचीसुद्धा एक परंपरा पहायला मिळते. आंबा किंवा शिवर या झाडाची होळीसाठी निवड केली जाते. पंधरा दिवस आधी हे झाड पाहिले जाते. त्यानंतर फागपंचमीला ही होळी आणण्यासाठी बालगोपळ आणि वाडीतील सर्व मंडळी जमतात. ढोल ताशांचा गजर सुरू होतो. त्यानंतर होळी तोडण्याची प्रथा सुरू होते. होळी तोडताना नारळ आणि पानाचा मानाचा विडा होळीच्या झाडाच्या बाजूला ठेवला जातो. मानकऱ्याचा हा मान असतो.
होळी तोडायच्या आधी देवाला गाऱ्हाणे घातले जाते. त्यानंतर लगबग सुरू होते ती होळीचे झाड तोडण्याची. त्यानंतर हे होळीचे झाड वाजतगाजत घेऊन येतात. यावेळी फाकाही घातल्या जातात. गावकरी हातातून होळी नुसती आणत नाहीत. तर, ती नाचवत आणली जाते. विधीवत पूजा करून गावागावातून आणि वाड्यावस्तीतून तोडून आणलेल्या झाडांची होळी उभी केली जाते. विधीवत त्याची पूजा केली जाते. त्यानंतर या होळीभोवती रात्री होम पेटवण्याची प्रथा आहे. पुढचे 15 दिवस या शिमगोत्सवाचा उत्साह असणार आहे.
हेही वाचा -
इंदोरीकरांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द; पुरोगामी संघटनांनी केला होता विरोध
काळजी घ्या..! शेंगदाणे खाणे बेतले जीवावर, धुळ्यात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू