रत्नागिरी - नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीने कंबर कसली आहे. शिवसेनेला टक्कर देण्यासाठी आघाडीकडून माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. किर हे यापूर्वी शिवसेनेत होते, मात्र आता त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी पक्षातील तडजोडीनुसार नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणूक होणार हे नक्की आहे. त्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या या पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित आघाडी, आरपीआय गवई गट व महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष एकत्र आले आहे. त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
शहराला विकासाच्या दृष्टीने मागे लोटणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेच्या उमेदवाराला या निवडणुकीत पराभूत करणारच, असा विश्वास शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलिंद कीर यांनी आज शहर विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सहा पक्ष एकत्र येऊन झालेली आघाडी ही वज्रमूठ आहे, आम्ही ठोसा हाणणार आणि सेनेच्या उमेदवाराला पराभूत करणार असा विश्वास व्यक्त करत आजच आपण शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे फॅक्सवर पाठवून दिल्याचे किर यांनी सांगितले.