रत्नागिरी - गौरी-गणपती विसर्जन झाल्यानंतर कोकणात उत्सवासाठी आलेले चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र, मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ होत आहे. खेड रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांकडून गाडीवर दगडफेकही करण्यात आली.
मडगाव येथून मुंबईकडे जाणारी गाडी क्रमांक 10104 मांडवी एक्स्प्रेस खेड रेल्वे स्थानकात न थांबताच पुढे गेल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. खेड रेल्वे स्थानकातून अनेक प्रवाश्यांनी परतीचे आरक्षण केले होते. मात्र,गाडी न थांबल्याने तिची वाट पाहत असलेल्या प्रवाशांना गाडीत चढता आले नाही.
संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांच्या कक्षामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, रेल्वे पोलीस व खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - आरे'तील वृक्षतोडीला राष्ट्रवादीचा विरोध; सुप्रिया सुळे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने 'गणपती स्पेशल हॉलिडे एक्स्प्रेस' खेड स्थानकातून सोडली. मात्र, ही हॉलिडे एक्स्प्रेसही प्रवाशांनी खच्चून भरली होती. पाय ठेवायलाही डब्यात जागा नव्हती. त्यामुळे प्रवाशांनी या गाडीवर दगडफेक केली.