रत्नागिरी - शहरातील कॉम्पुटर गोदामात दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुद्देमालही हस्तगत केला आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्राचे गोडावून साफ करण्याची सुपारी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असून १९ लाख ८३ हजार ४०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शहरातील परकार रुग्णालयाजवळ अष्ठविनायक संकुल आहे. संकुलातील तळ मजल्यावर व्यंकटेशा सिस्टीम नावाचे लॅपटॉप विक्रीचे होलसेलर दुकान आहे. गोदामाचे मालक हे प्रवीण घोरपडे सांगलीचे आहेत. घोरपडे यांचा भाचा संकेत चव्हाण हा येथील व्यवसाय सांभाळतो.
रविवारी सायंकाळी तीन तरुणांनी गोदामाबाहेरून सकेंत नावाने आवाज दिल्याने ओळखीचे ग्राहक आल्याचे समजून त्यांने दरवाजा उघडला. मात्र, आरोपींनी सकेंतला चाकूचा धाक दाखवत गोदामातील खुर्चीला बांधले आणि गोदामातील ४९ लॅपटॉप, ११ मॉनिटर, असा मिळून सुमारे १७ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लुटला.
यासंबधी तक्रार दाखल करण्यता आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी चौकशी केली आणि त्यांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले. फुटेजमधील इनोव्हा गाडी ही सांगली येथील असल्याचे समोर आल्यानंतर रातोरात पोलीसांचे पथक सांगलीच्या दिशेने रवाना झाले. सांगलीमधील कुपवाडा पोलीस व रत्नागिरी पोलीस यांनी सापळा रचून चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
महेश रामचंद्र चौगुले (३३,सांगलवाडी, सांगली), सूरज सदाशीव निकम (२५,कडमवाडी रोड,सांगली), सुनील चंद्रकांत घोरपडे (वय३०,कर्नाळा, नांदेरोड मिरज) आणि रेवणसिद्धू हनुमंत बगले (१९, सांगलवाडी, सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सर्वांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
पोलिसांनी या प्रकरणातील १४ लाख २३ हजार १६३ रुपयांचे ३६ लॅपटॉप, ५८ हजार २०८ रुपयांचे ११ मॉनिटर तर २ हजार रुपयांचे १ हेडफोन, गुन्ह्यात वापरलेला चाकू, व एक इनोव्हा गाडी असा मिळून १९ लाख ८३ हजार ४०६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी महेश रामचंद्र चौगुले व होलसेलर प्रवीण घोरपडे हे मित्र असून ते सांगली येथे नेहमी भेटायचे. घोरपडे यांचा व्यवसाय रत्नागिरीत असल्याची माहिती चौगुले यांना मिळाली होती. त्यानुसार चौगुले यांनी रत्नागिरीमध्ये येऊन गोदामाची रेकी केली आणि चोरी करण्याचा कट रचला. दरम्यान या प्रकरणात अजून दोन आरोपी निष्पन्न झाले असून त्यानाही लवकरच अटक होईल, असा विश्वास अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.