रत्नागिरी - शहरातील राजीवडा नजिकच्या शिवखोल येथे कोरोना पॉझेटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर पोलिसांनी राजिवड्याचा पूर्ण भाग बंद केला आहे. त्याभागात येण्या-जाण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक घरात जाऊन तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाकडून परिसरात निर्जंतूकीकरणही करण्यात आले आहे.
दिल्ली नजिकच्या निजामुद्दीन मरकज येथून रत्नागिरीत १ एप्रिलला आलेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालायात दाखल केले होते. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझेटिव्ह आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळीच पोलीसांनी घडपेवठार, काशी विश्वेश्वर मंदिर कमान, भाटे पुलानजिकच्या पायवाटेसह कर्ला जुवेकडे जाणारा रस्ता लाला कॉम्पलेक्स जवळ बंद केला. त्या भागात आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त अन्य नागरिकांना आत-बाहेर जाण्याला मनाई करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात दिड किलो मीटर, तर दुसऱ्या झोनमध्ये तीन किलो मीटरचा परिसर बंद करण्याचे आदेश प्रांतानी दिले असून तसे नियोजन तयार करण्यात आले आहे.
राजिवडा भाग सिल करण्यात आला असला तरिही तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा जिल्हा प्रशासनाने सुरु ठेवला आहे. दरम्यान सिल केलेल्या भागात नागरिकांना जिवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू दिला जाणार नाही. कोरोना पॉझेटिव्ह रुग्णाला बरे करण्याचे आमचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरु आहेत. नवा कोरोना रुग्ण सापडणार नाही यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनेला सहकार्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.