रत्नागिरी- राज्य शासनाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. रत्नागिरीतही भाजपतर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आले. "माझे अंगण हेच रणांगण" अशा स्वरूपाचे हे आंदोलन रत्नागिरी जिल्ह्यातही भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केले.
जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीत आंदोलन करण्यात आले. कोकणातील नियोजनशून्य धोरणामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे कोरोना स्वॅब सेेंटर रत्नागिरीत सुरु करावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. राज्य सरकारच्या विरोधात बॅनर घेवून कारभाराचा निषेध करण्यात आला.
'आम्ही खबरदारी घेतली, सरकारने जबाबदारी नाही घेतली, 'निघाले कामगार, उद्धवा अजब तुझे सरकार, 'कोरोना आलाय दारात, मुख्यमंत्री बसलेत घरात, अशा आशयाचे फलक हातात धरून काळ्या फिती लावून रत्नागिरीच्या भाजपा कार्यलयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत हे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील राजापूर, लांजा, संगमेश्वर, रत्नागिरी तालुका येथेही हे आंदोलन करण्यात आले. जनतेनेही या आंदोलनात सहभागी होऊन शासनाच्या अकार्यक्षम धोरणांचा धिक्कार करावा, असे आवाहन भाजपातर्फे करण्यात आले आहे.