रत्नागिरी - आपल्या समाजाची मतदारसंघात साडे तीन लाख मते असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगून निवडणुकीचे तिकीट घेणाऱ्या नविनचंद्र बांदिवडेकरांनी ही मते गेली कुठे याचे आधी आत्मपरीक्षण करावे. त्यानंतर दुसऱयांवर आरोप करावेत, असे प्रत्युत्तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी नविनचंद्र बांदिवडेकर यांना दिले आहे. रमेश कदम यांनी निवडणुकीत काम केले नसल्याचा आरोप बांदिवडेकर यांनी लोकसभा पराभवानंतर केला होता.
सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर नविनचंद्र बांदिवडेकर निवडणूक लढवत होते, मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. मात्र, त्यांनी आपल्या पराभवाचे खापर काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमेश कदम तसेच मित्रपक्षांवर फोडले होते. त्याला रमेश कदमांनी उत्तर दिले आहे. मतदारसंघात बांदिवडेकर ज्या समाजातून येतात त्या भंडारी समाजाचे प्राबल्य आहे. पंरतु, ती मते काँग्रसला मिळाली नाहीत, असा कदम यांचा बोलण्याचा रोख होता.
याबाबत बोलताना रमेश कदम म्हणाले की, ज्यावेळी पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी बांदिवडेकर मुंबईला गेले होते, त्यावेळी स्वतः मी तिथे उपस्थित होतो. यावेळी बांदिवडेकर यांनी आपल्या समाजाची साडेतीन लाख मते असून, ही मते मिळाली तर आपला विजय निश्चित असल्याचे पक्षश्रेष्ठींसमोर सांगितले होते.
पक्षश्रेष्ठींनी सारासार विचार करून जर एवढी मते यांना मिळणार असतील आणि जर पक्षाचे पाठबळ दिले तर हा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल, असा विचार करून यांना तिकीट दिले. मात्र, ही साडेतीन लाख मते गेली कुठे याचे आधी बांदिवडेकरानी आत्मपरीक्षण करावे, मग दुसऱयांवर आरोप करावेत, असे ते म्हणाले.
आपले अपयश लपविण्यासाठी दुसऱयांवर खापर फोडायचे ही गोष्ट बरोबर नाही. चांगले वातावरण असताना सुद्धा इथे पक्षाला अपयश आले, याला कारणीभूत स्वतः उमेदवार बांदिवडेकर आहेत. त्यांना जी मते पडली आहेत, ती काँग्रेसची मते आहेत. त्यांच्या समाजाची मते त्यांना पडली नाहीत. त्यामूळे दुसऱयांवर आरोप करण्याआधी नविनचंद्र बांदिवडेकर यांनी याचे आधी आत्मपरीक्षण करावे असे प्रत्युत्तर रमेश कदम यांनी दिले आहे.