रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब ( Anil parab ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रामदास कदम ( Ramdas kadam critics ) म्हणाले की, अनिल परबला लवकर आत टाकला पाहिजे, अजून का उशीर होतोय ते कळत नाही. ते आज खेडमधील लोटे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्धवजींना असेच बडवे बाजूला लागतात. अनिल परब, सुभाष देसाई आहे व विनायक राऊत अशीच माणसं त्यांना लागतात. हे बडवे जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत उद्धवजींचे काही खरे नाही, असे रामदास कदम यावेळी म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या विधानावर काय म्हणाले - अंधेरी पोटनिवडणूकित ज्या दिवशी भाजपने माघार घेतली, त्याच दिवशी ऋतुजा लटके यांचा विजय झाला होता. आता जे चालू आहे ते सर्व राजकारण सुरू आहे. तसेच अब्दुल सत्तार यांनी नेमके काय म्हटले आहे, ते मी पाहिले नाही. पण सर्वांनी महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, हे माझे प्रमाणिक मत आहे, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर दिली आहे.
खोक्यांच्या विषयावर काय म्हणाले - सध्या खोके-खोके विषय चालला आहे, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. तुमच्यात हिम्मत असेल तर प्रूफ करून दाखवा. एकनाथ शिंदे खोके देताहेत पण ते विकासकामांसाठी देत आहेत, अशीही प्रतिक्रिया रामदास कदम यांनी यावेळी दिली.