रत्नागिरी - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात विनाकारण गाड्या घेऊन नियमांचे उल्लंघन करत फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करून या वाहनचालकांना एक चांगली शिस्त लावली जात आहे. विशेष म्हणजे, या कारवाईमुळे जिल्ह्यात हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या कमालीची वाढली आहे. तर, जवळपास 95 दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे हेल्मेटसक्ती यशस्वी झाल्याचे चित्र आहे. तसेच नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून विक्रमी दंडही वसूल करण्यात आला आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर अगदी सुरुवातीपासून पोलिसांकडून विनाकारण बाहेर फिरू नका, असे आवाहन करण्यात येत होते. मात्र तरीदेखील काही नागरिक या नियमांचे उल्लंघन करत दुचाकी, चारचाकी घेऊन मोठ्या प्रमाणावर बाहेर पडताना दिसत होते. पण, नियमांवर बोट ठेवत वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. हेल्मेट नसणे, सीटबेल्ट न घालणे, किंवा विरुद्ध दिशेने वाहन चालवणे अशा प्रकारचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली.
लॉकडाऊनच्या या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी 28 हजार 599 वाहनचालकांकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल केला आहे. तर, यामध्ये हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या 13 हजार 154 दुचाकीस्वारांकडून तब्बल 65 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात शहर असेल किंवा इतर भागांत असेल मोठ्या प्रमाणावर वाहनचालक कारवाईच्या भीतीने नियमांचे पालन करत आहेत. शिवाय हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. जवळपास 95 टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरू लागले असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.
पोलिसांकडून आवाहन केल्यानंतर देखील वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नव्हते किंवा हेल्मेट घातले जात नव्हते. मात्र, कोरोनाच्या या काळात पोलिसांनी केलेल्या कडक कारवाईमुळे वाहन चालकांना मात्र चांगली शिस्त लागली आहे.