रत्नागिरी - पाकिस्तानच्या कैदेतील भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची सुटका होण्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी संगमेश्वरच्या श्री देव कालभैरव जोगेश्वरी (भैरी भवानी) मंदिरात कुलस्वामिनीला अभिषेक केला. तसेच कुलभूषण जाधव यांच्या सुखरुप सुटकेसाठी साकडंही घातलं. आज सकाळी त्यांनी मंदिरात कुलस्वामिनीची पूजा, अभिषेक केला. यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. खातू यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मार्च 2016 पासून कुलभूषण पाकिस्तानच्या ताब्यात..
कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. सुधीर जाधव हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. तर 51 वर्षांचे कुलभूषण जाधव हे नौदलातील अधिकारी होते. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारत सरकारने केला होता. दरम्यान कुलभूषण जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचे पाकिस्तानने सांगितले. कुलभूषण जाधव नौदलातील कमांडिंग ऑफिसर दर्जाचे अधिकारी आहेत. ते भारतातील गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे.
शिक्षेला स्थगिती..
पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाची कलमे लावून कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला फटकारात फाशीला स्थगिती दिली.