रत्नागिरी - रत्नागिरी - खंडणीसाठी व्यवसायिकावर गोळीबार करणारा कुख्यात गुंड सचिन जुमनाळकर याला जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटकात बेड्या ठोकल्या आहेत.
सचिन जुमनाळकरने ढेकणे नावाच्या व्यावसायिकाकडे 50 हजारांची मागणी केली. संबंधित रक्कम देणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला. या रागातून सचिन जुमनाळकरने त्यांच्या पोटात गोळी झाडली. यानंतर तो चारचाकीतून फरार झाला. पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर त्यांनी निरीक्षक शिरीष सासने व अन्य पोलीस कर्मचाऱयांच्या नेतृत्वाखाली पथके रवाना केली.
कर्नाटकात रचला सापळा
विजापूर येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना करण्यात आले. विजापूर नजीक असलेल्या होरती गावात सचिन जुमनाळकर आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सापळा रचला. काही वेळानंतर जुमनाळकरसह तिघे दुचाकीवरून येताना दिसले. सोबतच्या खबऱ्याने संशयिताची ओखळ पटवली. मात्र, पोलीस मागावर असल्याचा अंदाज आल्याने या तिघांनी पळ काढला. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून ताब्यात तिघांनाही घेतले. जुमनाळकरने चौकशीदरम्यान मनोहर हनुमंत चलवादी (वय-42) सिद्धाराम नामदेव कांबळे (वय-28) हे दोघे गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती दिली. यातील मनोहर चलवादी हा गोळीबारादरम्यान सोबत होता. तर, सिद्धाराम कांबळे यावेळी गाडीत होता. चलवादी हा जुमनाळकरचा पुतण्या असून सिद्धाराम कांबळे त्याचा मेहुणा आहे. त्यांनी गुन्ह्यात वापरलेले चॉपर, चारचाकी तसेच मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे.
२०१९ नोव्हेंबरपासून होता फरार
सचिन जुमनाळकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी खून, खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत. तो खूनाच्या गुन्ह्यामध्ये कोल्हापुरातील कळंबा कारागृहात २००८ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. या शिक्षेदरम्यान त्याने संचित रजेसाठी अर्ज केला होता. परंतु, पोलीस निरीक्षकांनी तो अर्ज फेटाळला होता. मात्र, यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबईच्या उच्च न्यायालयात त्याने रि-पिटीशन दाखल केली. यावेळी जुमनाळकरला 28 दिवसांची संचित रजा मंजूर झाली.
26 नोव्हेंबर 2019 रोजी तो कारागृहात हजर राहणे आवश्यक होते. मात्र, जुमनाळकर फरार झाला. याबाबत त्याच्यावर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल आहे. आता पुन्हा जुमनाळकरला पोलिसांनी कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे.