रत्नागिरी - मिरजोळे येथील निखिल कांबळे हा 13 वर्षाचा मुलगा 11 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. शनिवारी त्याचा मृतदेह मिरजोळे येथे एका चरामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, उसने पैसे परत मागितले म्हणून निखिलच्या मित्रानेच त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी निखिलच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी त्या मित्राला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
तुझे पैसे आज देतो, माझ्याकडे पैसे आले आहेत, असे सांगून त्या मित्राने निखिलला बोलवून घेतले होते. त्यानंतर पैसे मिळण्याच्या आशेने निखिल मित्रासमवेत घवाळीवाडी सडा येथे गेला होता. तेथे गेल्यानंतर निखिलने पैसे मागितले. यावेळी मित्राने निखिलला पकडून त्याचा गळा दाबला.
११ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मित्राने निखिलला पैसे देण्यासाठी बोलवले होते. त्यानंतर पाडावेवाडीतून नदी पार करून दोघेही घवाळीवाडी सडाकडे जंगलातून गेले. अर्धा तास चालल्यानंतर दोघेही सड्यावर पोहोचले. सायंकाळची वेळ असल्याने सड्यावर कोणीही नव्हते. त्यानंतर निखिलने मित्राकडे पैशाची मागणी केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. निखिलला मारण्याच्या उद्देशाने त्याला घेऊन मित्र सड्यावर गेला होता. त्यामुळे काही क्षणातच त्याचा गळा आवळून त्याला मारले. त्यानंतर एका चरात त्याचा मृतदेह टाकला. नजिकच असलेले मोठे दगड मृतदेहावर टाकून दगडांचा ढिगारा तयार केला. मोठे दगड हा मुलगा एकटा उचलू शकतो का, असा संशय पोलिसांना होता. परंतु, प्रत्यक्षिकांमध्ये आपण दगड कसे उचलून आणले हे त्या मुलाने पोलिसांना दाखवले.
दरम्यान, निखिल वारंवार पैशासाठी तगादा लावत असल्यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी केलेल्या चौकशीत स्पष्ट झाले. या तरुणाची काही महत्वाची कागदपत्रे पोलिसांना जंगलात सापडली आहेत.