चिपळूण ( रत्नागिरी) - येत्या ३ जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. यामध्ये १८ जवानांसोबत २ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आपत्ती काळात लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व साहित्यांसह एनडीआरएफ टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, ३ तारखेला या कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळामुळे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व घरातून बाहेर पडू नये. त्यासंदर्भात सावध तसेच घरी राहण्याच्या सूचना तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.
निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या दरम्यान अशी घ्या काळजी...
- मच्छीमार व अन्य व्यक्तींनी समुद्रामध्ये जाऊ नये.
- 3 जून रोजी अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी घुसणार नाही, याची खात्री असल्यास घरातच सुरक्षित रहावे. घराच्या बाहेर पडू नये.
- आपले घर मोडकळीस आलेल्या स्थितीमध्ये असेल किंवा कच्च्या स्वरुपाचे असेल तर तत्काळ उंचावरील ठिकाणी किंवा सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामग्री सोबत घेऊन स्थलांतरीत व्हावे.
- घराच्या अवती-भवती वादळामुळे कोणत्या वस्तू, विजेचे खांब किंवा तारा, झाडे पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तूंपासून लांब राहावे.
- आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षितस्थळी हलवावे.
- आपल्याजवळ केरोसीनवर चालणारे दिवे (कंदिल) बॅटरी, गॅसबत्ती, स्टोव्ह, काडीपेटी या वस्तू उजेड व खाद्यपदार्थ बनवण्यासाठी उपलब्ध ठेवाव्यात.
- हवामान खात्याकडून मिळणारे इशारे समजण्यासाठी जवळ रेडिओ बाळगावा. त्यासाठी काही जास्त बॅटऱ्या जवळ ठेवाव्यात.
- सोबत आवश्यक अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे जवळ ठेवावे.