रत्नागिरी- शासनाने राबिविलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत घरोघरी जावून सर्वेक्षण केल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढीला अंकुश घालण्यात चांगले यश मिळाले आहे, असे मत राज्याचे महसूल, सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले. राजापूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, उपविभागीय अधिकारी प्रविण खाडे, तहसीलदार प्रतिभा वराळे आदी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सत्तार यांनी घेतला आढावा-
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी माझे कुटुंब माझी जबाबदारी, नैसर्गिक आपत्ती, महा-राजस्व अभियान या सर्वच घडामोडींचा आढावा घेतला. यावेळी कोरोना संकटात उत्तम कामगिरी करणाऱ्या प्रशासनाचे त्यांनी कौतूक केले. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, याची खबरदारी संबंधित विभागानी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
तहसीलदार कार्यालय, पंचायत समित्या यांच्या नवीन इमारती बांधणे, राजापूर व लांजातील नद्यांमधील गाळ उपशाबाबत यावर्षीच्या वार्षिक अंदाजपत्रकात निधीची तरतूद करुन हे गाळ उपशाचे काम मार्गी लावले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
लांजा तहसील नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करा
या दौऱ्यादरम्यान महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लांजा तहसील कार्यालयाचीही पाहणी केली. तहसील कार्यालयात लागणाऱ्या सर्व सुविधा विचारात घेवून नवीन इमारतीचा आराखडा तयार करा आणि लवकरात लवकर अंदाजपत्रक तयार करुन नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हयाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे सादर करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जुने तहसील कार्यालयातून कामकाज सुरुच ठेवून लांजा तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येईल, असेही सत्तार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.