रत्नागिरी - भारताचा कायदा कसा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. भारताचा कायदा कसा असतो हे राणेंना पुन्हा एकदा दिसून आले आहे, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केलेली आहे. ते आज (दि. 25 ऑगस्ट) चिपळूणमध्ये बोलत होते.
राणेंना आता शहाणपण सुचले पाहिजे - खासदार राऊत
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, आजपर्यंत नारायण राणेंना 302, 326, 337 या कलमांपलीकडे त्यांना काही माहीत नव्हते. कारण आजपर्यंत त्यांनी या कलमांचा वापर करून अनेकांचे जीव घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांना तेवढेच माहिती होते. केंद्रीय मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने वागायला पाहिजे, त्याची जबाबदारी काय असली पाहिजे, हे कालच्या कायद्याने त्यांना शिकवले आहे. न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत, त्याच्यापासून त्यांना शहाणपण सुचले पाहिजे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.
भाजपला राणेंच्या रुपाने पणवती लागली - खासदार राऊत
केंद्र आणि सरकारमधील अंतर अजिबात वाढलेले नाही. नारायण राणेंच्या वक्तव्याची लेखी तक्रार मंगळवारी (दि. 24 ऑगस्ट) मी पंतप्रधानांकडे केलेली आहे. अर्ध्या तासाच्याआत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची दखल घेतली. त्यांच्या कार्यालयाने मला कळवले की ही तक्रार आम्ही गृहमंत्र्यांकडे पाठवलेली आहे, तुम्ही त्याचा फॉलोअप घ्या. दरम्यान, आपल्या तक्रारीची दखल पंतप्रधानांनी गांभीर्याने घेतली. भाजपला या यात्रेच्या माध्यमातून नारायण राणे यांच्या रूपाने पनवती लागलेली असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
हिंमत असेल तर उघडपणे या - खासदार राऊत
खासदार विनायक राऊत यांच्या घरावर बाटल्या आणि दगड फेकणाऱ्यांबद्दल राऊत म्हणाले की, काळोखातून काहीजण दगड आणि बाटल्या फेकून गेलेले आहेत. हिंमत असेल तर उघडपणे या मी उघडपणे फिरत असतो. अशी नौटंकी करणाऱ्यांना आम्ही भीक घालत नाही, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - नारायण राणेंना अटक करताना बंद खोलीत असा घडला हायहोल्टेज ड्रामा, पाहा VIDEO