रत्नागिरी - चिपळूण पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) आमदार भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभारावरून भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले. संबंधित अधिकारी ऑफिसमध्ये बसून फक्त मिटिंग्स घेत आहेत. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले भास्कर जाधव -
या सगळ्या भयानक पूर परिस्थितीला प्रशासन जबाबदार आहे. चिपळूणमध्ये पूरपरिस्थितीच्या अगोदर सायरन का वाजवला नाही? कुठे होते पोलीस? कुठे होतं प्रशासन? असा सवाल उपस्थित करत ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
खचलेल्या पूलावर पोलीस बंदोबस्त का नाही? हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता, तरीही तुम्ही का तयारी ठेवली नाहीत? अधिकार तुम्हाला आहेत की आम्हाला असे सवालही त्यांनी या बैठकीत उपस्थित केले.
चिपळूणमध्ये महापुराने व्यापाऱ्यांची किती दाणादाण उडवून दिलेली आहे, ती पुरानंतरची दृश्य बघितल्यावर लक्षात येते. या पुराने व्यापाऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. लाखो-करोडोंचे नुकसान या पुराने झालेले आहे. चिपळूण शहरातील सर्वात मोठं खरेदी मार्केट म्हणजे किंग सुपर मार्केट, भोगाळे मध्ये असलेलं हे मार्केट पुर्णतः पाण्याखाली गेलं होतं. त्यामुळे जवळपास दीड ते दोन कोटींचं नुकसान झालेले आहे.
जिवनावश्यक वस्तूही गाळात
चिपळूण शहर पाण्यात बुडाले होते. त्यामुळे घरं, दुकानं सर्वत्र चिखलच साचला आहे. घरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे साठवून ठेवलेली एकही वस्तू खाण्यायोग्य राहिली नाही. दुसरीकडे जिवनावश्यक दुकानातही चिखल झाला आहे. सर्व वस्तू चिखलाने माखल्या आहेत. त्यामुळे दुकानातही वस्तू मिळत नाही, जेणेकरून खरेदी करून पोट भरता येईल.
रोगराईचा धोका
चिपळूणमधील अनेक किराणा दुकानात पाणी शिरले. सध्या पाणी ओसरले असले तरी त्या सर्व वस्तू चिखलाने माखलेल्या आहेत. त्यामुळे अनेक दुकानदारांची दुकाने पाण्यात गेली आहेत. सध्या दिसत असलेल्या वस्तूही खाण्यायोग्य नाहीत. कारण गाळाने माखलेले पदार्थ धुऊन खाल्ले तर पुन्हा रोगराईच्या धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिपळूणमध्ये 75 टक्के घरं पूरामुळे बाधित
'चिपळूणमध्ये 75 टक्के घरं पूरामुळे बाधित झाली आहेत. पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करावे. त्यांना लवकरच कर्ज मिळावे', अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर, चिपळूणसह इतर पूरग्रस्त भागात करणार पाहणी