रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकांची जी भूमिका होती, त्या भूमिकेला अनुसरून शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेवर शिवसेना आजही ठाम असल्याचे शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारे नाही, अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. याबाबत बोलताना उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकांना काय आवश्यक हे आमच्यासाठी महत्वाचे
याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, ज्यांनी पत्र लिहिले आहे, ते एका पक्षाचे प्रमुख आहेत आणी लोकशाहीने त्यांना त्यांची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. शिवसेनेची भूमिका ही पूर्वीपासून निश्चित आहे. मागच्या सरकारमध्ये सुद्धा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. तेथील लोकांना काय आवश्यक आहे, हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. लोकांनी विरोध केल्यामुळे त्यावेळच्या सरकारने देखील प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता. मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी लोकांना दिलेली कमिटमेंट पूर्ण केली.
हेही वाचा - रिफायनरी प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी चार कोटींचा खर्च; सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे खळबळ
त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली
दरम्यान आता एका पक्षाच्या प्रमुखांनी हे पत्र लिहिले आहे, त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाची किंवा त्यांची भूमिका मांडली आहे. मात्र, लोकांची जी भूमिका होती त्या भूमिकेला अनुसरून शिवसेनेने भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचे शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - राजापूर रिफायनरी'प्रकल्प हातातून गमावणे महाराष्ट्राला परवडणार नाही - राज ठाकरे