रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत कोणत्याही प्रकारे दबाव नव्हता. याबाबतचे उत्तर नाशिकचे आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहे. तर राणे यांच्यावर झालेली कारवाई ही कायदेशीरच आहे, अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. रत्नागिरी येथे ते बोलत होते.
'सर्व काही कायदेशीर'
याबाबत सर्व काही कायदेशीररित्या झालेले आहे. आशिष शेलार यांनी काय मागणी केली यावर मी काय बोलणार, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी आशिष शेलार यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीवर दिली आहे.
'मनाई आदेश लागू करण्यासाठी कुणाचाही दबाव नाही'
गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशा वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यासाठी कुणाचाही दबाव नाही. तो निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे, अशी प्रतिक्रियादेखील उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनाई आदेशावर दिली आहे. सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.