रत्नागिरी - एप्रिल महिन्यात जिल्ह्याला तीन वेळा अवकाळी पावसाने झोडपले आहे. बुधवारी आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. 2 मेपर्यंत ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली.
चिपळूण, संगमेश्वर, देवरुख, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस कोसळला. बुधवारी सायंकाळनंतर पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागात अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ पाऊस बरसत होता. 2 मे पर्यंत अवकाळी पावसाचा जिल्ह्यात मुक्काम असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारादेखील सुटेल. विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.