रत्नागिरी - मूळचे ओडिशाचे, शिक्षण तमिळनाडूमध्ये, शिवाय हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतवरही त्यांचं प्रभुत्व. पण महाराष्ट्राची राजभाषा 'मराठी'ही ते बोलतात अगदी अस्खलित, नागरिकांशी संवादही मराठीतूनच.. महाराष्ट्राची राजभाषा असलेल्या मराठीला दैनंदिन व्यवहारात नेहमीच आदराने महत्त्व देणारे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचा 'मराठी' शिकण्याचा प्रवास नेमका कसा होता ते पाहूया..
![Marathi Language Day Special](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-collectormarathi-spl-rth-mh10046_27022021120342_2702f_1614407622_705.jpg)
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा गेल्यावर्षीपासून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून आपला पदभार अगदी यशस्वीपणे सांभाळत आहेत. यापूर्वी त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारीही यशस्वीरीत्या सांभाळली होती.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा सर्वसामान्यांनाही आपलेसे वाटतात, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं बोलणं. स्वभावाने शांत, संयमी असलेले जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा भेटायला येणाऱ्या प्रत्येकाशी मराठीतूनच संवाद साधतात. त्यासाठी दररोजच्या व्यस्त कामातून वेळ काढून मिश्रा मराठी शिकले. त्यासाठी आवश्यक सर्व माध्यमे आणि कौशल्ये त्यांनी वापरली आणि अतिशय अल्पावधीत ते मराठी बोलू लागले.
जिल्हाधिकारी मिश्रा यांचा जन्म ओडिशाचा, त्यामुळे त्यांची मातृभाषा ओडिया. त्यांचे शिक्षण तमिळनाडूमध्ये झाले आहे, त्यामुळे तमिळ भाषाही येते. याशिवाय, हिंदी आणि इंग्रजी यावरही त्यांचे प्रभुत्व आहेच. याशिवाय, संस्कृतही त्यांना अवगत आहे. पण मराठीशी त्यांचा संबंध आला, तो आयएएस झाल्यानंतर महाराष्ट्रात आल्यावर.
आयएएस अधिकारी ज्या राज्यात जातात, तेथील मातृभाषा त्यांना शिकावीच लागते. शिवाय तेथील मातृभाषेची परीक्षाही द्यावी लागते. महाराष्ट्रातही नियुक्ती मिळाल्यानंतर 4 वर्षांत दहावीची मराठी विषयाची परीक्षा या अधिकाऱ्यांना द्यावी लागते, नुसती परीक्षा देऊन चालत नाही तर, त्यात पासही व्हावं लागतं.
![Marathi Language Day Special](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-collectormarathi-spl-rth-mh10046_27022021120342_2702f_1614407622_769.jpg)
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, आपण जेथे जातो त्या प्रांताची भाषा शिकलीच पाहिजे, तरच त्या प्रांतातील लोकांच्या समस्या आपल्याला अधिक जाणून घेऊन त्या सोडविता येतात. मराठी भाषा शिकणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता, असे ते सांगतात.
मराठी भाषा अतिशय सुंदर - मिश्रा
सुरुवातीला मराठी भाषा थोडी अवघड वाटते, पण ही भाषा अतिशय सुंदर आहे. मराठी आत्मसात करण्यासाठी, ती शिकण्यासाठी मेहनत घेतली. अकॅडमीमध्ये आम्हाला ट्रेनिंग देण्यात आले. शिवाय, सुरुवातीलाच 2 ते 3 निवडणुकांमध्ये काम केल्यामुळे मराठी बोलण्याची संधी मिळाली. शिवाय मराठी भाषा शिकण्यासाठी श्राव्य, दृक-श्राव्य माध्यमांचा वापर केला. वाचनही केलं. दहावीची मराठीची परीक्षा देण्यासाठी विशेष मेहनत घेतल्याचेही ते सांगतात. मुख्य म्हणजे मराठी चित्रपट तेही ऐतिहासिक चित्रपट आपल्याला पाहायला आवडतात, असे ते आवर्जून सांगतात. तर, जनतेशी संवाद साधताना मराठीतूनच बोलतो, त्यामुळे बोलताना माझी मराठी भाषा सोपी झाल्याचे मिश्रा सांगतात.
लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संस्कृतचंही शिक्षण घेतलेलं आहे. मराठी भाषेत संस्कृतचे अनेक शब्द असल्यामुळे मराठी भाषा लवकर अवगत करता आली, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.