रत्नागिरी - जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकामध्ये आज (सोमवारी) एका माथेफिरूने धिंगाणा घातला. या माथेफिरूने कार्यालयावर तसेच प्रवाशांवर दगडफेक केल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती समजताच खेड पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी माथेफिरूला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एक मनोरुग्ण माथेफिरू आज सकाळी खेड रेल्वे स्थानकात आला. या मनोरुग्णाने सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्थानकात अक्षरशः धिंगाणा घातला. त्याने खेड स्थानकातील स्टेशन मास्तरच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसेच प्रवाशांवर देखील दगडफेक केली. यामध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून इतरही काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
दरम्यान अचानक दगडफेक झाल्याने नेमके काय झाले हे अनेकांना क्षणभर कळले नाही. दगडफेक केल्यानंतर हा माथेफिरू नजीकच्या जंगलात पळाला. रिक्षाचालक आणि स्थानिक नागरिकांनी याचा शोध घेतला आणि या माथेफिरूला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.