रत्नागिरी - गुहागर तालुक्यात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खोडदे येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीमध्ये पडून या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये भक्ष्याच्या शोधात असलेले बिबटे विहिरीत पडण्याच्या घटनावाढत आहेत. गुहागर तालुक्यातील खोडदे येथे मंगळवारी ग्रामपंचायतीच्या विहिरीत पडून बिबटयाचा मृत्यू झाला. हा बिबट्या सहा वर्ष वयाचा होता. भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा-VIDEO: पेंच अभयारण्यात वाघिणीने केली सांबराची शिकार; व्हिडिओ व्हायरल
माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण परिक्षेत्र वनाधिकारी राजेंद्र पाटील , गुहागर वनपाल संतोष परशेट्ये , रानवी वनरक्षक अरविंद मांडवकर घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ सतिश पालकर यांनी विहिरीत उतरून ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला बाहेर काढले. वनविभागाचे अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. मृत बिबट्याचे शव हे पशूवैद्यकीय दवाखाना चिपळूण येथे पाठविण्यात आले. बिबट्याचा परिसरात वावर आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
हेही वाचा-अमरावतीत ८० वर्षांच्या जोडप्याची २३ वर्षांपासून विषमुक्त शेती
दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ येथे वायररोपमध्ये अडकलेल्या बिबट्याची वनविभागाने 30 डिसेंबरला सुखरूप सुटका केली होती. हा बिबट्या भक्ष्याच्या शोधात असताना शेतात लावलेल्या वायररोपमध्ये रात्रीच्या सुमारास अडकला होता. या मादी बिबट्याला वैद्यकीय तपासणी केल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.