रत्नागिरी - जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याने परिसरातील गावात घबराट निर्माण झाली आहे. ही माहिती प्रशासनाला समजताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ज्या ठिकाणी गळती लागली आहे, त्याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी धरणातून बाहेर येत आहे. या ठिकाणी खबरदारी म्हणून या गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे.
नागरिकांचे स्थलांतर
तिवरे दुर्घटनेचे प्रकरण ताजे असतानाच आता मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याचं समोर आलं आहे. मात्र यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. धरणाला गळती लागल्याचे कळताच तहसीलदार आणि पोलीस धरण परिसरात दाखल झाले. सध्या परिसरातील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. जवळपास दोनशे ते अडीचशे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. या धरणाच्या पायथ्याशी जवळपास सहा वाड्या असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. प्रशासन गळतीचे प्रमाण पाहून पुढील निर्णय घेईल मात्र असे असले तरी खबरदारी म्हणून येथील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात येत आहे.
दरम्यान गळती ठिकाणी पिचिंग करण्याचे काम सुरू असून पाणी गळती होणाऱ्या ठिकाणी पोत्यातून माती भरून भराव केला जात आहे. तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा दाब कमी करण्यासाठी सांडव्याची उंची तोडून कमी करण्याचे काम सुरू आहे.