रत्नागिरी - जिल्ह्यात अद्याप देखील तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव दिसत आहे. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू होता. दुपारी बारा नंतर पावसाचा जोर ओसरला. दरम्यान तौक्ते चक्रीवादळामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून मोठे नुकसान झाले आहे.
कर्ला परिसरातही मोठे नुकसान
वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी नागरिकांनी स्वतः उन्मळून पडलेली झाडे बाजूला केली.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई किनारपट्टीची दृश्य
जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विज अद्यापही नसून, काही ठिकाणी विजपुरवठा सुरळीत सुरू झाला आहे. दरम्यान, रत्नागिरी तालुक्यातील कर्ला परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. किशोर चव्हाण यांच्या घराच्या अर्ध्या भागावर जवळपास 50 वर्षांपेक्षा जास्त जुने झाड कोसळले. घराचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेत चव्हाण यांच्याशी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने बातचीत केली.
हेही वाचा - पालघर : चक्रीवादळाचा धोका; नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ