रत्नागिरी- अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला सुरुवात झाली आहे. या वादळाचा फटका रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाकेड इथे दरड कोसळ्याची घटना घडली. मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग महामार्गावर पसरल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
वाहतूकदार नाराज
महामार्गावर दरड कोसळ्यामुळे वाहतूकदारांना वाहन चालवण्यास अडचणी येत आहे. परिणामी सध्या एकेरी मार्गावरूनच दोन्ही बाजू्च्या वाहतूक सुरू आहेत. दरड कोसळल्यानंतर मात्र, ठेकेदारांकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे वाहतूकदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरूच
तौक्ते चक्रीवादळाचे परिणाम अद्यापही कोकण किनारपट्टीवर दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभरापासून रत्नागिरी किनारपट्टीवर वेगवान वारे वाहत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं पडल्याने नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज अद्यापही गायब आहे.
प्रशासनाकडून हालचाली सुरू
तौक्ते चक्रीवादळाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणारे तसेच कच्च्या घरात राहणाऱ्या 2,254 नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सुस्थळी हलविले आहे. रात्रीत अजून काही हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. तसेच वादळाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवारण कक्षात वॉर रूम तयार करून यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे.