रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाला वेग आला असून, नुकतीच या मार्गावर विद्युत इंजिनची यशस्वी चाचणी करण्यात आली. ठोकूर ते उड्डपी दरम्यान विद्युतीकरणाची पहिली चाचणी करण्यात आली. ही चाचणी यशस्वी देखील झाली. एकूण 46 किलोमीटर या टप्प्यात ही ट्रायल घेण्यात आली. या चाचणीमुळे कोकण रेल्वेने खऱ्या अर्थाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल केली आहे.
हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात रत्नागिरी विराट मोर्चा
सध्या कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे काम सध्या 65 टक्के पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या 740 किमी मार्गावरील विद्युतीकरण कामासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात रोहा ते वेरणापर्यंत एल अँड टी तर वेरणा ते ठोकूरपर्यंत कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड कंपनीकडे दिली आहे. या ठेकेदार कंपन्यांच्या माध्यमातून विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. कोकण रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, ट्रान्समिशनसाठी पॉवर स्टेशन व ओव्हरहेड वायरसाठीचे खांब उभारणीचे काम सध्या सुरू आहे. या विद्युतीकरणासाठी 1100 कोटी रुपये खर्च आहे. विद्युतीकरणावर कोकण रेल्वे धावू लागल्यावर डिझेलच्या वापरावर नियंत्रण येऊन डिझेलची बचत होणार आहे. पर्यायाने शेकडो कोटी रुपये वाचणार आहेत.
हेही वाचा - रत्नागिरी नगरपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'त्या' चार नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी