रत्नागिरी - संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरातील काही ठिकाणी हातपट्टीची परवानगी असताना सक्शन पंप लावून अनधिकृतपणे वाळू उपसा केला जात आहे. वारंवार कारवाई करूनही वाळू माफिया प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र असून सद्या वाळू माफियांच्या अशाच दबंगगिरीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करजुवे परिसरात अनधिकृतपणे वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियावर कारवाई करत प्रशासनाने सक्शन पंप आणि बोटी जप्त केल्या होत्या. हे सर्व साहित्य पोलीस पाटलांच्या घरासमोर ठेवण्यात आले होते. बोट जप्त करण्यात आल्याने वाळू माफियांची गोची झाली होती.
तेव्हा वाळू माफियांनी ही बोट पळवण्याचा निर्णय घेतला आणि पोलीस पाटलांच्या घरासमोरील ती बोट मध्यरात्री पळवून देखील नेली आणि त्याच ठिकाणी दुसरी जुनी बोट आणून ठेवली. मात्र, हा बोट पळवतानाचा थराराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता प्रशासन या वाळू माफियांवर नेमके काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.