रत्नागिरी - भारतीय जलक्षेत्रामध्ये घुसखोरी, तस्करी आणि अवैधरीत्या बेकायदेशीर कामांना रोख लावण्यासाठी तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये आयसीजीएस सी-452 ही बोट सामील झाली आहे. तटरक्षक कमांडर (समुद्री पश्चिम क्षेत्र) अप्पर महानिर्देशक राजन बड़गोत्रा, पीटीएम, टीएम यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बोटीचे तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राचे कमांडर महानिरीक्षक ए. पी. बडोला यांच्या उपस्थितीत जयगड येथे अनावरण करण्यात आले. ही बोट जयगड येथे तैनात राहणार आहे.

हेही वाचा - राज्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय मच्छिमारांची घुसखोरी, स्थानिक मच्छिमार आक्रमक
12.7 एमएम हेवी मशीनगन हे मुख्य शस्त्र
या जहाजाची प्राथमिक भूमिका तस्करी प्रतिबंध, सागरी गस्त, शोध आणि बचाव यासारखी विविध कामे पार पाडणे आहे. या जहाजासाठी एक अधिकारी आणि 14 नाविकांची तुकडी तैनात असेल. या जहाजात आयबीएस, ईसीडीआयएस आणि जीएमडीएसएस ही अत्याधुनिक उपकरणे आहेत. 12.7 एमएम हेवी मशीनगन हे या जहाजाचे मुख्य शस्त्र आहे.
जयगड येथे राहणार तैनात
तटरक्षक दलाच्या ताफ्यामध्ये सामील झाल्यानंतर आयसीजीएस सी-452 ही बोट जयगड (रत्नागिरी) येथे तैनात राहील. या बोटीच्या कमान अधिकारी पदाची जबाबदारी सहाय्यक कमांडंट अमोघ शुक्ला यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आयसीजीएस सी-452 हे भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या अधीन पाचवे जहाज आहे. या बनावटीचे हे तिसरे जहाज आहे.