रत्नागिरी - पश्चिम महाराष्ट्रात पूराने थैमान घातल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामुळे संपूर्ण राज्यातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. 'हेल्पिंग हॅण्ड' या नावाने राबवण्यात आलेल्या योजनेला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. अनेक संस्था व नागरिकांनी एकत्र येऊन उत्स्फूर्तपणे मदत केली. धान्य, कपडे, औषधे अशी जमेल त्या मार्गाने मदत करून सावरकर नाट्यगृहात हे सामान एकत्र केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ आणि सांगलीतील पलूस या ठिकाणी ही मदत पोहोचवली जाणार असून, काहींनी मदत पोहोचवण्यासाठी स्वत:चे ट्रक मोफत दिले आहेत.
या सामानाची वाहतूक करण्यापासून ते वाटपच्या नियोजनापर्यंत सर्व यंत्रणा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी उभी केली आहे.