रत्नागिरी - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाने आज (गुरुवार) दुपारनंतरही हजेरी लावली. चिपळूण, रत्नागिरी, लांजा परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी गारपीट बघायला मिळाली.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला -
कोकणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. जिल्ह्यात बुधवारी रात्री काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज पहाटेही काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आज संध्याकाळी चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गारांचा पाऊस पडला. तर सायंकाळी ६.४५ च्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने लांजा शहर परिसराला झोडपून काढले. यावेळी गारांचीही बरसात झाली. दुपारी ३ च्या दरम्यान तालुक्याच्या पूर्व भागातील शिपोशीसह अन्य गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. येथेही ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस अर्धा तास बरसला.
काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी गारा -
रत्नागिरी तालुक्यातही संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तर करबुडे गावात तर मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. काही ठिकाणी पाऊस नुसती वर्दी देऊन गेला. या अवकाळी पावसामुळे पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आंबा, काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - आधी अभिषेकशी तर लढा, मग माझा सामना करा; दीदींचे थेट अमित शाहंना खुले आव्हान