रत्नागिरी - जिल्ह्यात आज (बुधवारी) पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री पावसाचा जोर होता, बुधवारी सकाळी पावसाचा जोर ओसरला, मात्र सकाळी 11 नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आणि विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस बरसला. जवळपास तासभर पावसाची बरसात सुरू होती.
रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी परतीच्या पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळी पावसाने उसंत घेतली होती मात्र, मात्र ढगाळ वातावरण कायम होतं, पण साडेअकरा वाजल्यापासून ढगांच्या गडगडाटासह विजांच्या लखलखाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
पुढील चार दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत 16 ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे.
आयएमडीच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली आहे.