रत्नागिरी - अन्न व औषध प्रशासनाने दापोलीतील एका गोदामावर छापा टाकून 9 लाख 97 हजार रुपये किंमतीचा गुटखा आणि पानमसाला जप्त केला. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेला साठा गणेश गोविंद खेडेकर याच्या मालकीचा असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी गणेश खेडेकरच्या दापोली येथील गोदामावर छापा मारला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. याची किंमत 9 लाख 97 हजार असल्याची माहिती अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दिली.
हेही वाचा - ...म्हणून विकीपीडियासह टिकटॉकवर टांगती तलवार
प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या साठ्यामध्ये विविध कंपन्यांच्या पदार्थांचा समावेश आहे. हे गोदाम सील करण्यात आले असून गणेश खेडेकरच्या विरोधात अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.