रत्नागिरी - विघ्नहर्त्या गणरायाच्या पाच दिवसांच्या मंगलमय उत्सवाची जिल्ह्यात सांगता झाली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत कोकणात गणरायाला निरोप देण्यात आला. कोरोनाचं संकट असल्याने कोणताही गाजावाजा न करता ढोल ताशांच्या गजराशिवाय अत्यंत साध्या पद्धतीने आज रत्नागिरी जिल्ह्यात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं.
कोरोनाचे संकट दूर होऊ दे असं गाऱ्हाणं घालत बाप्पाला निरोप -
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती गणपतींची तर १०८ सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी १२ हजार ३३४ घरगुती आणि २ सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात आले. तर १ लाख १७ हजार २१३ घरगुती आणि १९ सार्वजनिक गणपतींचे गौरीबरोबर विसर्जन करण्यात आले. प्रशासनातर्फे ठिकठिकाणच्या विसर्जनस्थळांची स्वच्छता करण्यात आली होती. गेले पाच दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर गौरी-गणपतींना निरोप देण्यात आला. कोरोनाचे संकट दूर होऊ दे असं गाऱ्हाणं घालत 'बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या' असे आवाहन करत गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.
कृत्रिम तलावांची निर्मिती -
रत्नागिरी नगर परिषदेने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची उभारणी केली होती. कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. समुद्रकिनारी जीवरक्षकांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच निर्माल्य संकलनासाठी कलशही ठेवण्यात आले होते. कोरोनाचं संकट असल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव गणेशविसर्जनासाठी उभारण्यात आले होते.