रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. सरत्या वर्षापर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रोहा ते ठोकूर या ७४१ कि.मी.च्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे काम आहे. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होऊन डिझेल इंजिनावरील इंधन खर्चात वार्षिक २० टक्के बचत होण्यास मदत होईल, असे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोकण रेल्वे २५ वर्षाचा टप्पा पार करणारी दिवसेंदिवस कात टाकत आहे. एकीकडे दुपदरीकरणचे काम वेगात सुरू आहे. तर दुसरीकडे आता विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. २०१९ च्या अखेरपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्युतीकरणासाठी गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या कामाने खऱया अर्थाने आता गती घेतल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी रेल्वेस्थानक व मार्गावर रत्नागिरीसह कुडाळ, आरवली अशा ५ ठिकाणी विद्युतीकरणासाठी सबस्टेशनही उभारण्यात येणार आहेत. ही कामे लवकरच पूर्णत्वास नेण्यासाठी त्याठिकाणी कामे सुरू आहेत. ७४१ किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणासाठी १ हजार १०० कोटी इतका खर्च केला जाणार आहे. रत्नागिरी व कारवार अशा २ विभागांतर्गंत विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत.
रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेला मोठे फायदे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या मार्गावर धावणाऱया रेल्वेगाड्यांचे इंजिन हे डिझेल इंधनावर चालते. डिझेल इंधनामुळे निघणाऱया धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मार्गाचे विद्युतीकरण झाल्यास यातून सुटका होण्यास मदत होणार आहे.