रत्नागिरी - जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास आवश्यक असून, कोणालाही विनापास जिल्ह्यात येता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी कोरोनामुळे चाकरमान्यांना काही सूचना केल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी गावात या मात्र, अगोदर 14 दिवस क्वारंटाईन व्हा, 7 ऑगस्टपूर्वीच गावी या, अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आत्ताच मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावात दाखल होत आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. सध्या मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या कशेडी घाटात रांगा लागल्या आहेत. जवळपास 2 ते 3 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या पहायला मिळत असून, यामुळे घाटात वादाचे प्रसंगही घडत आहेत. तर दुसरीकडे काहीजण बनावट पास घेऊन येत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास येत आहे. अशा एका वाहनाला खेडमध्ये पकडण्यात आले आहे. जिल्ह्यात येताना ई-पास आवश्यकच असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच कोणत्याही चुकीच्या वृत्तावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.