रत्नागिरी - जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष विजय भोसले यांनी रत्नागिरी तालुका कॉंग्रेस कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर कॉंग्रेसमधील वाद उफाळून आला आहे. माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर यांच्या गटाला डावलण्याचे काम सुरू आहे. आज जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी चक्क कॉंग्रेस भवनला टाळे ठोकले व त्यावर नोटीस लावली आहे.
हेही वाचा - आज 2019 या वर्षातील शेवटचे कंकणाकृती सूर्यग्रहण, भारतातूनही पाहू शकता
कॉंग्रेस भवनच्या चाव्या खालील व्यक्तींकडे म्हणजेच दिपक राऊत व बंडू सावंत यांच्याकडे उपलब्ध असतील. ज्यांना कॉंग्रेस भवन पक्ष कार्यालयसाठी उघडे पाहिजे किंवा इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांना हवे असल्यास त्यांनी कामाचे स्वरुप सांगून सदरील व्यक्तींकडून चाव्या घेव्यात, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
कॉंग्रेस भवन बंद असल्याने माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर व लांजा-राजापूर भागातून आलेले कार्यकर्ते बाहेर ताटकळत उभे होते. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली होती. यातून शहर अध्यक्ष राकेश चव्हाण यांना जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी अचानक पदमुक्त केले होते. जिल्हाध्यक्षांच्या या वागणुकीबाबत माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर यांनी संताप व्यक्त केला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कॉंग्रेसभवन हे आपली मालमत्ता असल्यासारखे व त्याचा सातबारा आपल्या नावावर असल्यासारखे वागत असल्याची भावना किर यांनी यावेळी व्यक्त केली. यामुळे आता कॉंग्रेसमधील ही गटबाजी कोणते वळण घेते याकडे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.