रत्नागिरी - शहरामध्ये सध्या पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. संपूर्ण शहराला योग्य पाणीपुरवठा करणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला परिपूर्ण पाणीपुरवठा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोणत्याही कर्मचारी, अधिकाऱयाने रजा घेऊ नये. जर रजा घेतली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद रत्नागिरी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिली आहे.
आरोग्य विभागानेही 1 जून दरम्यान सर्व गटारे साफ करून डास प्रतिबंधक फवारणी करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या आहेत.
शहरामध्ये पाण्याची प्रचंड ओरड आहे. अनेक भागात पाणी जात नाही. काही भागात कमी दाबाने पाणी जाते तर काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम नगरपरिषदेकडून सुरू आहे. मात्र, टँकरने पाणीपुरवठा करताना काही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण, नागरिकांना पाणी देणे हे आपले कर्तव्य असल्याने पाऊस पडत नाही, तोपर्यंत पाणी विभागाच्या कोणत्याही प्रशासन अधिकारी, कर्मचार्याने रजेवर जायचे नाही. जर कोणी गेले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. परिस्थिती हाताळण्यास पाणी सभापती सक्षम आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर कारवाई होणारच, असा स्पष्ट इशारा नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी दिला आहे.