रत्नागिरी - क्यार चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकत असल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला आहे. किनारपट्टीपासून हे वादळ जवळपास 300 किमीने पुढे सरकले असून, त्याचा दूर जाण्याचा वेगही वाढलेला आहे. त्यामुळे आता कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
गुरुवारी (दि.24ऑक्टो) ला चक्रीवादळ कोकण किनारपट्टीपासून दोनशे दहा किलोमीटर अंतरावर होते. मात्र सध्या या वादळाने दिशा बदलली असून, ते आता कोकण किनारपट्टीपासून दूर गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हे वादळ ताशी 12 किलोमीटर वेगाने ओमानच्या दिशेने जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर धडकण्याचा धोका आता टळला आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
परंतु, चक्रीवादळाचा पुढील काही दिवस प्रभाव कायम राहणार असून, कोकणात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.