रत्नागिरी - सापडलेल्या पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची उपचारानंतरची दुसरी टेस्टही निगेटिव्ह आली आहे. सोमवारी पहिली टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर मंगळवारी दुसरी टेस्टही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही.
परदेशातून आलेला शृंगारतळी (गुहागर) येथील एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. गेल्या काही दिवसांपासून या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, सोमवारी रुग्णाची पहिली टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर मंगळवारी दुसरी टेस्टही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक बोल्डे यांनी दिली. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारण जिल्ह्यात एकमेव कोरोनाचा रुग्ण होता. आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. या रुग्णाची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
अजूनही धोका टळलेला नाही, अधिक खबरदारी घेणं आवश्यक - जिल्हाधिकारी
दरम्यान, असे असले तरी अजूनही धोका टळलेला नाही. नागरिकांनी बिनधास्तपणे वावरू नये. अजूनही कोरोनाचे संकट टळलेले नाही. १४ एप्रिलपर्यंत सर्व नागरिकांनी आता अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यापुढे एक ही रुग्ण वाढू नये, असे वाटत असले तर प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.