चिपळूण (रत्नागिरी)- कोकणाच्या सौंंदर्यावर निसर्गाची मुक्तहस्ताने उधळण झाली आहे. पावसाळ्यात कोकणाचे सौदर्य अधिक खुलून दिसते. डोंगरकड्यावरून वाहणारे धबधबे, धुक्यासह गर्द झाडींमध्ये हरवलेल्या सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वत रांगा आणि सततच्या पावसात चिंब भिजलेला घाट रस्ता हा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरला आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला आहे. त्यामुळे कोकणातील अनेक पर्यटनस्थळांचे रुपडे आता पालटले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात आता निसर्गाचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. मात्र, प्रतिवर्षी पर्यटकांना खुणावणाऱ्या या पर्यटनस्थळावर सध्या कोरोनामुळे पर्यटकांना मन मारून पाठ फिरवावी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली घाट कराड मार्गावर आहे. या घाटमार्गावरून प्रवास करताना अनेक नयनरम्य असे शुभ्र पाण्याचे धबधबे पाहायला मिळतात. सह्याद्रीची पर्वत रांग ढगाच्या दाट पट्ट्यांमध्ये अधुंक होऊन गेली आहे. पावसाळ्यात कुभार्ली घाट म्हणजे पर्यटकांसाठी मोक्याचे ठिकाण आहे. या ठिकाणी घाटातील वळणावरून या डोगररांगांनी पांघरलेला हिरवाशालू पाहून कोणत्याही पर्यटकांना फोटोग्राफी केल्याशिवाय पुढे जावे वाटणार नाही. सध्या घाटात अनेक लहान लहान धबधबे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक डोंगराच्या कडा ढगांनी व्यापून गेल्या आहेत. पर्यटनासाठी सध्या ही योग्य वेळ आहे. मात्र, यंदा कोरोनाचा प्रभावामुळे पर्यटकांची उणीव भासू लागली आहे.
कुंभारली घाट निसर्ग सौंदर्य़ाने नटला आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करत या ठिकाणांवर बंदी आदेश लागू केला आहे. परिणामी यंदा घाटामध्ये येणारे पर्यटकांचे प्रमाण पूर्ण कमी झाले आहे. पर्यटक घाटातील निसर्गाचा आनंद घेऊ शकत नाहीत. नयनरम्य असा कुंभार्लीघाट यावेळी मात्र पर्यटकांविना ओस पडला आहे.