रत्नागिरी - जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात आणखी एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाणार येथे रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. मात्र, आता राजापूरातीलच बारसू-सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पासाठी काँग्रेसने समर्थन दिले आहे.
नाणारमधील विरोधानंतर बारसू सोलगाव येथे रिफायनरी कंपनीच्या माध्यमातून जागेची चाचपणी होत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे राजापूरच्या विकासासाठी राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्प बाहेर जाऊ नये, तसेच याठिकाणी विस्थापन नसल्याने बारसू-सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पासाठी काँग्रेसने समर्थन दिले आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दिली. दरम्यान, तौक्ते चक्रीवादळानंतर कोकण दौऱ्यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील रिफायनरीला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते.
शून्य विस्थापन असल्याने बारसू-सोलगावमध्ये पाठिंबा - खलिफे
नाणारमधील विरोधानंतर रिफायनरी कंपनीने बारसू एमआयडीसीत जागेचा शोध सुरू केला आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली साडेअकरा हजार एकर जमीन कातळपड आहे. त्यामुळे या जागेचा उपयोग होऊ शकतो, असा दावाही हुस्नबानू खलिफे यांनी केला आहे. याबाबत बोलताना खलिफे म्हणाल्या, राजापूर तालुक्यातील नाणार भागात होणारे संभाव्य विस्थापन आणि धार्मिक अधिष्ठानांना येऊ शकणारी संभाव्य बाधा याचा विचार करुन काँग्रेसने स्थानिक जनतेची मागणी लक्षात घेतली होती. यानुसार नाणार भागात प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता शून्य विस्थापन असलेल्या बारसू-सोलगांवच्या जागेत तालुक्यासह स्थानिक जनतेलाच प्रकल्प हवा असल्याने काँग्रेसने याठिकाणी प्रकल्पाचे समर्थन करीत पुन्हा स्थानिक जनतेसोबत राहण्याची पक्षीय भूमिका घेतल्याचे खलिफे यांनी सांगितले.
हेही वाचा - चिखलदऱ्यात साकारला जात आहे जगातील पहिला 'सिंगल रोपवे स्कायवॉक'
विरोध झाल्यास समजूत काढू -
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा विरोध येथे होणार नाही, असा दावाही खलिफे यांनी केला आहे. राजापूरच्या विकासासाठी येथे प्रकल्पाला अनुकूल जागा आहे. त्यामुळे वेळ पडली तर विरोध करणाऱ्या पक्षांना समजवण्याची जबाबदारी आपण घेऊ, असेही खलिफे म्हणाल्या. दरम्यान, आता या ठिकाणी आता शिवसेनेची भूमिका नेमकी काय राहील?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थ अनुकूल -
दरम्यान, काही बारसू-सोलगाव येथील काही ग्रामस्थदेखील या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. येथे रोजगार नाही, म्हणून आमची मुले मुंबई-पुण्यात जातात. कसेतरी जीवन जगतात. मात्र, हा प्रकल्प आला तर पुन्हा ते रोजगारासाठी इकडे येतील. प्रकल्पासाठी आम्ही जमीन द्यायला तयार असल्याचे बारसूचे ग्रामस्थ जयंत कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - शेतकरी झाला कोट्यधिश... सोयाबीन बाजारात न विकता तयार केले बियाणे, इतर शेतकऱ्यांना विकले