रत्नागिरी - समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ आज राजापूर आंबोळगड येथून सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करेल असा अंदाज आहे. सागवे, साखरीनाटे आदी भागातून हे वादळ पूर्णगड वरुन सायंकाळी चारपर्यंत रत्नागिरी शहर परिसरात येईल. यानंतर जयगड आदी भागातून हे वादळ रात्री अकरा वाजेपर्यंत गुहागरपर्यंत व परवा पहाटे दापोली वरून ते पुढे जाईल, असा अंदाज असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कालच दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण झाले असुन रिमझिम पाऊस पडत आहे.
वादळ जाणार्या पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी
या दृष्टीने प्रशासन सज्ज असून वादळ जाणार्या भागातील पाच तालुक्यात पूर्णपणे संचारबंदी करण्यात आली असून, लोकांना बाहेर पडण्यास बंदी असणार आहे. या वादळाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागाला सज्ज राहण्यास सांगितले आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी स्थलांतर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी स्थलांतरही झाले आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण
दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, तसेच रिमझिम पाऊस सुरू आहे. कालही दिवसभर सूर्यदर्शन झालेले नव्हते, तसेच काल मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. आजही काहीशी अशीच परिस्थिती आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहे.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही; वादळवाऱ्यासह पाऊस बरसणार